कोल्हापूर येथील न्यू पॅलेस व भवानी मंडप
कोल्हापूर येथील न्यू पॅलेस ( नविन राजवाडा ) व जुना राजवाडा (भवानी मंडप )
कोल्हापूर म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर आणि छत्रपतींची गादी. याच कोल्हापूर मधे सुप्रसिद्ध असलेले श्री शाहू महाराज संग्रहालय खूप सुंदर आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यापूर्वी संग्रहालयाचा आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परिसर, एक विस्तीर्ण उद्यान तसेच राजवाड्याच्या परिसरातील खुले प्राणी हरीण, सांबर, इमू पक्षी ,बदक पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात.
छत्रपती शाहू पॅलेस 1877 ते 1884 या काळात बांधण्यात आले. ब्रिटीश वास्तुविशारद ‘चार्ल्स मॅत’ यांनी या राजवाड्याचे डिझाईन केले आहे. काळ्या रंगाच्या पॉलिश केलेल्या दगडात बांधलेला हा राजवाडा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असल्याने, पर्यटकांच्या आर्कषणाचा भाग झाला आहे. या वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य ठीक ठीकाणी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित घटनांची चित्र रेखाटलेली आहेत. संग्रहालयात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे फोन बंद केल्यानंतरच आत प्रवेश दिला जातो.
पॅलेसच्या तळमजल्यावर वस्तुसंग्रहालय आहे. राजेशाही कुटुंबातील वेशभूषा, दागिने, मौल्यवान वस्तू यांचा एक सुरेख संग्रह केला आहे. शाहू महाराज यांनी शिकार करताना वापरलेल्या बंदुका, लहान मोठ्या आकाराचे भाले, तलवारी, शिकार करताना घालायचे कपडे यांचा संग्रह येथे पाहावयासल मिळतो. शाहूच्या महाराजांच्या कारकीर्दीत जुनी नाणी, वंशपरंपरागत पाळणा, पलंग, बसण्यासाठीचे नक्षीदार सोफे, चित्त्यांच्या मणक्यापासून बनवलेली काठी, गेंड्याचे पाय असलेला टेबल, शहामृगाचे पाय असलेला मेणबत्ती स्टॅण्ड इ. त्यांच्या नावासहीत सुबकरीत्या मांडल्या आहेत, त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांना त्या वस्तूविषयी नेमकी माहिती सहज जाणून घेता येते. शाहू महाराजांनी शिकार केलेले वाघ, जंगली कुत्रा, गवा, सिंह, हरीण, अस्वल प्रक्रिया करून जतन करून ठेवले आहेत, हे वन्य प्राणी व विदेशी पक्षी सर्वासाठी एक प्रमुख आकर्षण आहे. ब्रिटीश व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांच्याशी केलेले पत्रव्यवहार यातील काही पत्र आपल्याला संग्रहालयात पहायला मिळतात. या संग्रहालयाच्या मध्यभागी अतिउच्च सुशोभित दरबार आहे, जेथे शाहूच्या काळात शासकीय, न्यायालयीन सत्रांचे आयोजन होत असे. दरबाराच्या मध्यभागी एक सिंहासन आहे, ज्यावर बसून शाहू महाराज दरबाराचे कामकाज चालवत असत.
छत्रपती शाहू महाराज यांचे काळात चित्रकलेला विशेष महत्त्व दिले जात असे, त्यानुसार राजवाड्यात एक भाग दुर्मिळ चित्रांचा सुंदर संग्रह केला आहे. यामध्ये त्या काळातील स्त्रियांचा पेहराव यावरील एक तैलचित्र, शाहूंनी शिकार केलेल्या शंभराव्या वाघाबरोबरचे चित्र, हत्तीची शिकार केलेले तैलचित्र, या संग्रहालयाच्या भेटीचे मुख्य आकर्षण आहे असे मला वाटते.
भवानी मंडप
जुना राजवाडा
जुन्या राजवाड्यामध्ये छत्रपती घराण्याचे देवघर आहे. त्यास ‘श्री अंबा देवघर’ असे म्हटले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक, अशा ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला जुना राजवाडा भव्य आणि अप्रतिम बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. या राजवाड्यात राजश्री शाहू महाराजांचा सुंदर पुतळा आहे.
येथे शाहू महाराजांनी शीकार केलेले प्राणी प्रक्रिया करून सुरक्षित ठेवले आहेत.
पण स्टॉलधारक आणि विक्रेत्यांच्या अतिक्रमणा मुळे या जुन्या राजवाड्याचे सौंदर्य झाकले गेले आहे.
Comments
Post a Comment